मोहिते- पाटलांच्या साम्राज्याला आव्हान देणारा भूमीपुत्र काळाच्या पडद्याआड

दामाजीचे माजी अध्यक्ष चरणूकाका पाटील यांचे निधन

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चरनू काका पाटील यांचे किडनीच्या विकाराने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्यावेळी मोहिते पाटील बोले आणि राजकीय वातावरण हले अशी अवस्था होती, त्याकाळात मोहिते पाटलांच्या प्रभावाला झुगारून निवडणूक जिंकणारा जिल्ह्यातील पहिला नेता आणि मंगळवेढा तालुक्यातील भूमीपुत्र संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चरनुकाका पाटील यांना ओळखले जाते.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावात जन्मलेले चरनु काका पाटील हे माजी आमदार किसनलाल मर्दा यांच्या नेतृत्वाखाली दामाजी सहकारीचे उपाध्यक्ष होते. माजी आम सुधाकरपंत परिचारक यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 साली चरनूकाकांनी दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या मोहिते – पाटलांचा प्रभाव झुगारून दिला होता. त्यावेळी मोहिते – पाटील यांनी दामाजीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले.

कारखान्याचे संस्थापक मारवाडी वकील यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक होती. आणि त्यामध्ये मोहिते – पाटील समर्थक संचालकांची संख्या अधिक असावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भूमीपुत्राचा मुद्दा उपस्थित करून चरनु काकांनी मोहिते पाटलांचे राजकारण दामाजीची निवडणुकीतून हद्दपार केले.

आणि त्यांच्या समर्थकांच्या पॅनल विरोधात निवडणूक लढवून जिंकूनही आले. पुढे 5 वर्षे काकाच कारखान्याचे चेअरमन होते. त्या अगोदर दामाजी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद पडला होता आणि सुधाकरपंत परिचारक यांच्या मदतीने काकांनी तो यशस्वीपणे चालवला होता. मात्र 2011 -12 च्या निवडणुकीत काकांचे पॅनल पराभूत झाले तरीही विरोधी पॅनल मधील एकटे चरनु काका निवडून आले होते. त्यानंतरच्या काळात चरनु काकांचा राजकीय प्रभाव ओसरत गेला.
ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील चरणूकाका पाटील यांनी संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून दामाजी साखर कारखानाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. दामाजी साखर कारखाना उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले.तालुक्यातील जेष्ठ नेते माजी आमदार किसनलाल मर्दा व रतनचंद शहा या दोन जेष्ठ नेत्यांच्या नंतर चरनु काका हेच खऱ्या अर्थाने मंगळवेढा तालुक्यातील प्रभावी नेतृत्व होते. गेल्या 1 महिन्यांपासून किडनीच्या आजारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
गुरुवारी रात्री दोन वाजता त्याची प्राणज्योत मालवली, त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

One thought on “मोहिते- पाटलांच्या साम्राज्याला आव्हान देणारा भूमीपुत्र काळाच्या पडद्याआड

Leave a Reply

error: Content is protected !!