दामाजी च्या गोदामतील 90 हजार पोती साखर गायब

कारखान्याचे 28 कोटी रुपयांची 90 हजार 600 पोती साखर परस्पर विक्री

कारखान्यावर 200 कोटींचे कर्ज : कामगारांचे 10 कोटी रुपये पगार थकवले

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

भाजपचे आमदार समाधान अवताडे अध्यक्ष असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री, कामगारांचे पगार आणि इतर कारभाराची चौकशी केल्यानंतर सहकारी संस्थेच्या विशेष लेखापरीक्षक जी.व्ही.निकाळजे यांनी संत दामाजी च्या संचालक मंडळाच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. निकाळजे यांनी दिलेल्या अहवालानुसार दामाजी सहकारी साखर कारखान्याची 90 हजार 600 साखर पोती परस्पर विकून 28 कोटी 13 लाख रुपयांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या अहवालामुळे मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबत सभासद अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जण यांनी दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून काही आक्षेप नोंदवले होते. त्यानुसार तपासणी करून सहकारी संस्थेच्या वर्ग १ चे विशेष लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी तपासणीत गंभीर दोष नोंदवले आहेत. त्याबाबतचा अहवाल त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना सादर केला आहे. त्यामध्ये लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी केलेल्या तपासणीत आक्षेप आढळले.

निकाळजे यांच्या अहवालानुसार कारखान्यात
२०१७-१८ व २०१८-१९ हंगामात उत्पादित झालेली साखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांच्याकडे माल तारण कर्जापोटी ताब्यात दिली होती तक्रार दाराने ७५ हजार क्विंटल साखर कमी असल्याचे अर्जात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात ९० हजार ६७० क्विंटल साखर गोदामात कमी आढळून आली. तसेच ती कारखान्याने सदर बँकेस न कळवता परस्पर विक्री केली. बँकेचे तपासणी अधिकारी देखील या प्रकरणात सामील असून या साखर विक्रीपोटी २८ कोटी १३ लाख ४ हजार ७८० रक्कम बँक कर्ज खात्यामध्ये जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली.


या साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात भरणा न केल्यामुळे नाहक व्याजाचा भुर्दंड कारखान्याला सोसावा लागला. सदरच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. साखर विक्री टेंडरबाबतची जाहिरात जास्त खप असलेल्या वर्तमानपत्रात दिली नसल्याचे निदर्शनास आले. या नियमबाह्य पद्धतीमुळे साखर विक्री केल्याने स्पर्धात्मक दराचा फायदा कारखान्यास मिळाला नाही.

विशेष म्हणजे गोदामात साखर मोजता येणार नाही अशा अतिशय अस्ताव्यस्त प्रमाणात लावण्यात आलेली आढळुन आली. त्यामुळे सुमारे 21 हजार क्विंटल साखर मोजता येण्याच्या अवस्थेत नव्हती. झाडलोट केलेली सुमारे 3000 क्विंटल साखर पडल्याचे अहवालात नमूद केले आहे.

कारखान्यावर साधारणत २०० कोटीचे कर्ज आहे, गेल्या महिन्यापासून कारखान्यातील कामगार पगारापोटी ६ कोटी ७० लाख ६१ हजार ७९९ रूपये झाले थकीत आहेत. प्रायव्हेट फंडाच्या २ कोटी ७३ लाख ८४ हजार १६० रकमेचा भरणा केला नाही. कारखान्यांमधील ३८ कर्मचारी मयत असून , त्यांची ३१ लाख ५२ हजार ५३३ इतकी रक्कम अद्याप देणे आहे. सदर रक्कम थकीत राहण्याच्या कारणाचा खुलासा मागणी करून सादर केला नाही.


सन २०१८-१९ या कालावधीतील ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संशयास्पद वाटत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले. याबाबत या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तक्रारदाराने कोणत्या सालातील ताळेबंद व नफा तोटा याचा उल्लेख केला न करता कंपनी संशयास्पद म्हटले आहे.  (संदर्भ : बातमी मधील सर्व माहीती, विशेष लेखापरीक्षक जी व्ही निकाळजे यांच्या अहवालानुसार आहे.)

Leave a Reply

error: Content is protected !!