संगम 2.68 लाख : पंढरीत संध्याकाळी 3 लाखाची पातळी गाठणार
शहरातील झोपडपट्टी भागात पूर्णपणे पाणी घुसले आहे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गावर नियंत्रण मिळवले असताना आता पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग वाढला आहे. दौंड येथे भीमा नदीला 72 हजार 691 क्यूसेक्स चा विसर्ग असून वीर धरणातून 32 हजार 459 क्यूसेक्सचा विसर्ग सुरूच आहे.
दरम्यान, संगम येथे भीमा नदीची पातळी 2 लाख 68 हजार क्यूसेक्स तर पंढरपूर येथे 2 लाख 56 हजार क्यूसेक्स आहे. यामुळे ग्रामीण भागातील नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला असताना शहरातील सखल भागात पाणी घुसू लागले आहे.
गोपाळपूरचा पूल वाहतुकीसाठी सकाळीच बंद झालाय तर दगडी पुलाजवळचा नवीन पूल, टेम्भुर्णी मार्गावरील अहिल्या पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पंढरपूर चा सध्या केवळ कराड आणि पुणे मार्गाने संपर्क आहे. शहरातील 1200 तर ग्रामीण भागातील 1500 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
भीमेला वरून येणारा मोठा विसर्ग आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. आज संध्याकाळी चांद्रभागेची पाणी पातळी 3 लाख क्यूसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या बेताने लोकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.