उपमुख्यमंत्री अजित पवार करोना पॉझिटिव्ह ?

सर्व दौरे, कार्यक्रम रद्द : मुंबईमधील घरात क्वारंटाइन

टीम : ईगल आय मीडिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली असून त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता.

दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले असून अजित पवार याना सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरोना तपासणी केली, अहवाल निगेटिव्ह असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी घरीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर भागांचा दौरा केला होता. सोलापुरात बोलताना त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं. या दरम्यान त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!