राज्यात कोरोना वाढीला ब्रेक : 61 हजार बरे होऊन घरी गेले
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे ६१ हजार ६०७ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ती 6 लाखांच्या खाली आली आहे. तर रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.
राज्यात करोनाची दुसरी उग्र झाली असून रुग्णसंख्येचे सगळे उच्चांक दुसऱ्या लाटेत मागे पडले. एकवेळ तर दैनंदिन रुग्णसंख्या ७० हजारांच्या जवळ पोहचली होती. यामुळे सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र या स्थितीचा आरोग्य यंत्रणांनी नेटाने मुकाबला केला असून गेले काही दिवस वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यातही यश आले आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची भर पडली, त्याचवेळी ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण ८६.९७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आज करोनाने ५४९ रुग्ण दगावले असून राज्यातील करोना मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे.
सात लाखांच्या उंबरठ्यावर पोहचलेला हा आकडा कमी कमी होऊन आज सहा लाखांच्या खाली आला आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असले तरी तेथील आकडा १ लाखाच्या आत आला आहे.