महापुराच्या पाण्यात मध्यरात्री 9 जणांचे वाचवले प्राण

देवडे येथील रमेश भुई याच्या धाडसाचे होत आहे कैतूक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

देवडे ( ता. पंढरपूर ) गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. अशावेळी आपल्या घरात पुराचे पाणी येणार नाही, या समजुतीने घरात झोपलेल्या तीन जणांचे प्राण रमेश भुई या होडी चालकाच्या धाडसामुळे आणि तलाठी प्रकाश भिंगारे यांच्या समयसुचकतेमुळे वाचले.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवडे (ता. पंढरपूर) येथील
लक्ष्मी बापू नाईकनवरे (वय 85), त्यांचा दुर्योधन बापू नाईकनवरे हा मूक बधीर मुलगा आणि बहीण नगीना मनोहर गायकवाड (वय 65) या घरातच आतून कडी लावून, लाईट बंद करून झोपल्या होत्या. सदर महिला ही अर्धांगवायू ची रूग्ण होती. भीमा नदीला पूर आला आहे पण आपल्या घरापर्यंत पाणी येणार नाही या समजुतीने हे निर्धास्तपणे घरात झोपले होते. मात्र नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती.

गावचे तलाठी प्रकाश भिंगारे हे पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन गावातच मुक्कामाला होते, त्यांना मध्यरात्री 2 वाजता रामचंद्र झांबरे यांच्याकडून निरोप मिळाला की, लक्ष्मी नाईकनवरे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य पुनर्वसन केलेल्या ठिकाणी, शाळेत, मंदिरात कुठेच दिसत नाहीत.

मध्यरात्री 2 वाजता या कुटुंबाच्या शोधासाठी कुणीही जायला तयार होईना, तलाठी प्रकाश भिंगारे यांनी तत्काळ होडी चालक रमेश उद्धव सलामपुरे (भुई) (वय 24) याला सोबत घेतले. आजीचे वय 85 व वजन 90 किलो असल्याने उचलण्यासाठी चार लोकांची गरज होती.
अशा बिकट परिस्थितीत रामचंद्र शिवाजी झांबरे, गणेश अंकुश पाटील, धनाजी विष्णू करडे, मसू भिमराव नाईकनवरे, कुमार विलास कांबळे यांच्यासह स्वतः तलाठी प्रकाश भिंगारे यांनी या महिलेच्या घराकडे जाण्याचा निर्णय घेतला.

रात्री दोन वाजता दलित वस्तीमध्ये ही 80 वर्षांची महिला, तिचा बोलता येत नसलेला मुलगा आणि तिची बहीण हे सर्व एका 10 बाय 10 च्या खोलीमध्ये झोपले होते आणि संपूर्ण घराला 10 फूट पाण्याचा वेढा पडला होता. घर थोडे उंचावर होते मात्र उंबरठ्यावरुन पाणी घरात जाण्यास सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी अरुंद बोळ, वाटेत विजेचे खांब असतानाही होडी चालक रमेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाला सुखरूप सोबत घेऊन अगदी अरुंद जागेत त्यांना होडीत बसवले. या कुटुंबाला घेऊन होडी भीमा नदीच्या मध्यभागी धारेत आल्यानंतर होडीच्या उजव्या बाजूची लाकडी चिमणी बुडातून मोडली .

पाण्याला प्रचंड ओढ असताना, ऐन मध्यरात्री धारेत एका मोडलेल्या होडीत 9 जणांचा जीव मोठ्या संकटात सापडला होता. पाण्याच्या ओढीने होडी जागेवर थांबली व धारेत वाहू लागली. अशावेळी प्रसंगावधान राखून होडी चालक रमेश भुई यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील कपडयासह होडी समोर पूराच्या पाण्यात उडी मारुन होडीच्या घोडयाखालील कडी पकडून वाहत्या पाण्यात बुडून होडी तब्बल 300 फूटा पर्यंत ओढत आणली.

त्या काळरात्री होडीचालक रमेश याने धाडस दाखवले नसते तर प्रवाहाबरोबर एकूण नऊ लोक वाहून गेले असते. रमेश भुई या तरुण मुलाने तीन जणांचे प्राण वाचविण्यासाठी पुराच्या पाण्यात होडी घातली होती मात्र एकूण नऊ पैकी तीन जण पट्टीचे पोहणारे होते उर्वरित जीव मात्र रमेश मुळे वाचले. होडी चालक रमेश भुई याच्या धाडसाचे आणि तलाठी प्रकाश भिंगारे यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!