प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा एक सेवक हरपला

देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

मुंबई : ईगल आय मीडिया
माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे, अनेक जबाबदार्‍यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रणवदा यांच्या निधनाच्या वृत्त धक्कादायक आहे. त्यांना भारतरत्न जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मांडण्याची संधी मला मिळाली होती. केंद्रात अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य आणि परराष्ट्र व्यवहार अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. सुमारे 50 वर्ष विविध जबाबदार्‍यांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली. गांधी विचारधारेचे ते खंदे समर्थक आणि अनुयायी होते. अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक सुधारणांच्या ते अग्रस्थानी होते. भारतीय राजकारणातील एका महनीय नेतृत्त्वाचे असे आपल्यातून निघून जाणे, हे मनाला व्यथित करणारे आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या तसेच देशवासियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!