कोल्हापूर येथील धक्कादायक प्रकार
टीम : ईगल आय मीडिया
कोल्हापूर येथील क्षय रोगाने पीडित रुग्ण मयत झाला, त्याच्यावर अंत्यसंस्कार ही केले. मात्र तिसऱ्या दिवशी सरकारी रूग्णालयातून ‘तुमचा पेशंट शुद्धीवर आला आहे, त्याला घेऊन जा’ असा फोन आला. रुग्णालयात जाऊन पाहिलं, तर तो त्यांचा नातेवाईकच आणि जिवंत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर मग त्या नातेवाईकांना ही अंत्यसंस्कार कुणावर केले हा प्रश्न पडला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नारायण सदाशिव तुदिगल (३५) या तरूणास क्षयरोग झाल्याने उपचारासाठी सावित्रीबाई फुले रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात त्याच्यावर काही दिवस उपचार सुरू होते.
रविवारी दुपारी रूग्णालयातून तुदिगल यांच्या नातेवाईकाना ‘तुमचा रूग्ण मयत झाला असून ओळख पटवून मृतदेह घेऊन जा’ असा फोन आला. त्यानुसार तुदीगल याच्या पत्नीसह काही नातेवाईक रूग्णालयात गेले. पतीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने व्यवस्थित मृतदेह न पाहताच तिने हंबरडा फोडला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आणि पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले.
‘पोलिसांनी सर्व कागदपत्रे तयार करून दिली. त्या कागदपत्रानुसार रूग्णालयाने मृतदेह दिला. हा घोळ पोलिसांनी घातल्याने अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले आहेत. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे,’
डॉ. प्रदीप दीक्षित, डिन, रा. शाहू वैद्यकीय कॉलेज, कोल्हापूर
सोमवारी रक्षाविसर्जन करण्यात आले. त्याच दरम्यान दुपारी अचानक रूग्णालयातून दुसरा फोन आला. ‘तुमचा रूग्ण शुद्धीवर आला आहे, त्याला घेऊन जा’ असा निरोप आला. या फोनने नातेवाईकांनी तातडीने रूग्णालय गाठले. रूग्णालयात जिवंत पतीला पाहून पत्नीला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
त्यानंतर ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो मृतदेह कुणाचा? याबाबत चर्चा सुरू झाली. तर अंत्यसंस्कार झालेला मृतदेह एका बेवारस व्यक्तीचा असल्याचं समजलं. पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या घोळामुळे बेवारस मृतदेह तुदिगल यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसही आता चक्रावून गेले आहेत. हा घोळ नेमका कसा झाला याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.