प्रक्रिया पारदर्शक झाली नाही ; रद्द करा : 5 सदस्यांची तक्रार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील अजनसोंड येथे सरपंच निवडी वेळी घोळ झाला असून सरपंच निवड प्रक्रिया पारदर्शक झाली नाही,चुकीच्या पद्धतीने सरपंच निवड जाहीर केली असल्याचा आरोप करीत दादा- नाना ग्रामविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अजनसोंड येथील निवडणूकित दादा-नाना ग्रामविकास आघाडीने 9 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी गटाला 4 जागा मिळाल्या होत्या. सरपंच पद हे सर्व साधारण महिला वर्गासाठी आरक्षित होते. आज सरपंच निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पारदर्शक पार पाडली नाही असा आरोप दादा नाना विकास आघाडीच्या सदस्यांनी केला आहे.
सरपंच आणि उपसरपंच पदासाठीच्या चिट्ठया एकाच बॉक्सात टाकल्या होत्या. तो बॉक्स पारदर्शक नव्हता आणि संपूर्ण चिठ्या बाहेर न काढता अधिकाऱ्यांनी एकेक चिट्ठी बाहेर काढून अर्धवट उघडून , नीटपणे न दाखवताच विरोधी आघाडीच्या रुपाली घाडगे पाटील या सरपंच झाल्याचे जाहीर केले. त्यांना 5 मते पडली असे सांगून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले. तर दादा नाना विकास आघाडीला तुमचा उपसरपंच झाला आहे असे सांगून प्रक्रिया उरकून घेतली असा आरोप दादा नाना विकास आघाडीने केला आहे.
या आघाडीच्या सदस्यांनी या निवडीवर हरकत घेऊन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे ही या सदस्यांनी तक्रार केली आहे. तसेच ही निवड रद्द करून फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान विरोधी आघाडीच्या सदस्यांशी संपर्क साधला असता, झालेली निवड पारदर्शक नाही, दादा नाना विकास आघाडीच्या एका सदस्याने आमच्या आघाडीला मतदान केले आहे, त्यामुळे आमचा सरपंच झाला आहे, मात्र आता त्या आघाडीच्या सदस्यांनी सदर सदस्यांवर दबाव आणून ही निवड रद्द करण्याचा चुकीची मागणी केली आहे असे सांगितले.
एकूणच पंढरपूर तालुक्यात सर्वत्र निर्विवाद निवडी होत असताना अजनसोंड येथील निवडीमुळे मात्र गालबोट लागले आहे.