केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते झाला सन्मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून दिला जाणारा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवॉर्ड’ स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते व एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन प्रदान करण्यात आला. दरवर्षी देशभरातील ११ हजार संस्थामधील लाखो शिक्षकांमधून केवळ १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
डॉ.प्रशांत पवार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खर्डी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर गाठले. बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘सिव्हील इंजिनिअरींग’ मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते आसाममधील आयआयटी ‘गुवाहाटी’ मधून एम. टेक.ची पदवी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आय.आय.एस.सी. बेंगलोर येथून पी.एच.डी. सुवर्णपदकासह पूर्ण केली. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, चीन, दुबई आदी देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची चार पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत तर तीन पेटंटस त्यांच्या नावे आहेत.
हेड ऑफ सिव्हील इंजीनिअरिंग, डिपार्टमेंट, इन्स्टिट्यूट अॅक्रीडीएशन कोऑर्डिनेटर, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मेंबर सेक्रेटरी, इंटेल्लेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स अकॅडमी अशी विविध पदे ते भूषवित आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, कोलकत्ता इंडियाच्या राज्य कार्यकारणीवर एरोनॉटिक्स विभाग सदस्य म्हणून कार्यरत आहेत तर ‘हेलिकॉप्टर फोरम’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधिक संस्थेवर ते भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
यापूर्वी त्यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील गुणवंत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’ प्रथम क्रमांकाने मिळवल्याबद्दल डॉ.प्रशांत पवार यांचा स्वेरीचे विद्यमान अध्यक्ष एन.एस.कागदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त सुरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अभिनंदन डॉ. पवार सर