यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर !


कोल्हापूर : ईगल आय मीडिया
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2020 चा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. दत्तात्रय कवितके, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हारूगडे उपस्थित होते.


राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंती निमित्त समाज कार्य, समाज प्रबोधन, साहित्य कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिस अथवा संस्थेस सन 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, व्ही शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गुरु हनुमान, साथी नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमागरज, सुश्री मायावती, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, रँग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे, अण्णा हजारे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


सन 2020 चा 35 वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरुप हे 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील मेकगाव हे त्यांचे जन्म गाव असून कमवा व शिका या योजने अंतर्गत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आतापर्यंत 1 लाख 49 हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून 12 ते 14 तास रुग्णालयात काम करत होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये विशेषत: बीना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. मोतीबिंदूंची गुंतागुंत असलेल्या 2061 कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली आहे. बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे 35 टक्यांवरुन 1 टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.
राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे 100 हून अधिक सादरीकरणे आहेत. महाराष्ट्र आरोग्य सेवा विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे ते सदस्य असून वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘सामाजिक कऑगस्ट 2007 मध्ये 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याच्या पराक्रमाबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. सन २००8 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला. मुंबईच्या महापौरांनी त्यांचा ‘नागरी सात्कार’ देऊन गौरव केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!