गाढवांची सहल निघाली उटीला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील चंद्रभागेच्या वाळवंटात बेकायदेशीर वाळू वाहणारी 36 गाढवं पंढरपूर शहर पोलिसांनी पकडली होती, त्यांच्या मालकांचा थांगपत्ता नसल्याने ही गाढवं आता संगोपनासाठी थंड हवेचे ठिकाण उटीचा पाहुणचार घेण्यासाठी तामिळनाडूकडे रवाना झाली आहेत. ही गाढवं पंढरपूर मधील वाळू माफियांच्या टोळीतील आहेत.

भुरटे वाळू चोर चंद्रभागा नदीच्या पात्रातून या गाढवांच्या साह्याने नित्यनियमाने वाळू उपसा करत होती. पोलीस कारवाईला गेले की वाळू चोरटे पळून जातात आणि बिचारी गाढवे पोलिसांच्या हाती होती. आता या गाढवावर कशी आणि कोणती कारवाई करायची म्हणून पोलिसांनी या गाढवांना कधी ताब्यात घेतले नाही. पोलीस गाढवावर कारवाई करीत नाहीत म्हटल्यावर वाळू चोर अधिकच शिरजोर होत होते.


बेकायदा वाळू उपसा त्यात नदी पात्रातील मंदिरांना धोका उत्पन्न होऊ लागल्याने, याबाबत अनेक तक्रारी वाढू लागल्या आणि शेवटी पोलिसांनी गाढवं जप्त करण्याचा निर्णय घेतला. वाळू उपश्याच्या धाडीत पोलिसांना 36 गाढवं सापडली ही सर्व गाढवं पकडून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बांधण्यात आली. नेहमी प्रमाणे चोरटे पसार झाले.


दोन आठवडे झाले तरी गाढवांचा मालक काही या गाढवांना स्वीकारायला तयार नाही. रोज या गाढवांचा चारा पाणी आणि औषध उपचार करणे पोलिसांना नसती डोके दुखी झाली. महाराष्ट्रात गाढवं सांभाळण्याचा कोंडवडा नसल्याने या गाढवांचे करायचे काय असा यक्ष प्रश्न पोलीस प्रशासनासमोर आ वासून उभा होता.


शेवटी तामिळनाडू येथील उटीची खबर पोलिसांना मिळाली. उटी येथील एक प्राणी संस्था मोकाट गाढवाचे संगोपन करते अशी माहिती मिळाल्यानंतर त्या संस्थेशी संपर्क करुन ही 36 गाढवं आज ट्रक मधून उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर एनिमल एण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाडयात रवाना केली.


उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे तेथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक तिथे गर्दी करतात. पंढरीतील गाढवांना हा आलेला योग म्हणजे त्यांच्यासाठी राजयोगचं म्हणावा लागेल.
पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ. सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, पोना. गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, पोकॉ सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनिल बनसोडे, विजय देडे ही सगळी मंडळी या गाढवांच्या सरबराईत गुंतली होती गाढवांनी पंढरीचा निरोप घेतल्याने, या मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!