आज, उद्या राज्यात अतिवृष्टी चा ईशारा !

गुलाब वादळामुळे रेड अलर्ट

टीम : ईगल आय मीडिया

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आज संध्याकाळी आंध्रच्या किनारपट्टीवर सहाच्या सुमारास धडकण्याची शक्यता असल्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात मागील 2 दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. मात्र, संध्याकाळपर्यंत फारसा पाऊस नोंदला गेला नाही. मुंबईमध्येही रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रविवारी संध्याकाळी हे चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता हळुहळू कमी झाली, तरी त्याचा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याने राज्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी केले आहे.

रविवारी दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी चंद्रपुरात रेड अॅलर्ट आहे; तर मंगळवारी ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव येथे रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

या पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असेल. मात्र, हा जोर मंगळवारी वाढण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि रायगड येथे तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

मुंबईमध्ये तसेच रत्नागिरीमध्येही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. धुळे, जळगावमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे, नाशिक जिल्ह्यांतील घाट परिसर येथे घाट परिसरामध्ये तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी विदर्भातील पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मात्र, उर्वरित विदर्भामध्ये पावसाचा जोर फार नाही. रविवारच्या अंदाजानुसार विदर्भात अगदी मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकेल.

Leave a Reply

error: Content is protected !!