अनिल परब याना ईडी ची नोटीस !

टीम : ईगल आय मीडिया

परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून 31 ऑगस्ट रोजी चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खा. संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत सूचक विधानही केले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात अटक केल्यानंतर आकसाने अनिल परब यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे आपल्या ट्विटमधून राऊत यांनी सूचित केले आहे. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे. मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर राऊत यांनी ‘शाब्बास’ अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

किरीट सोमय्यांना अगोदरच माहिती होते ?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत  अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.

जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया chronology समजून घ्या, असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब हे धडाडीने काम करणारे नेते आहेत. ईडीची नोटीस बजावणे हे घाणेरडे आणि गलिच्छ राजकारण आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. मला यांची किव येते असे म्हणत भाजपचे नेते धुतळ्या तांदळासारखे आहेत का, असा सवाल करतानात महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचे हे काम असल्याचे सावंत म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!