भाई गणपतराव देशमुख यांचे निधन

राज्याच्या राजकारणातील दीपस्तंभ विझला !


संगोला : ईगल आय मीडिया

सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांचे आज ( दि.30 ) शुक्रवारी रात्री 9 वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे सांगोल्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील दीपस्तंभ विझला असून शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचितांचा आधार कोसळला आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळातुन राजीनामा दिल्यानंतर भाई एस टी बसने सांगोला इथं परत आले होते.

संपूर्ण राज्यभरात ज्यांच्या नेतृत्वाचा आदर्श सांगितला जातो, ते सांगोला तालुक्याचे 54 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून विक्रम करणारे भाई गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांना शुक्रवार, १६ जुलैरोजी सोलापूर येथे अश्विनी हाॅस्पिटल येथे एडमीट करण्यात आले होते. तेथे त्यांचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती आणि ते उपचाराला ते प्रतिसादही देत होते. मात्र मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती तर सायंकाळी अधिक चिंताजनक बनली होती. रात्री त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा ही झाली होती.मात्र आज रात्री 9 वाजन्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

भाई गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षातून सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून विक्रमी 11 वेळ निवडून गेले. महाराष्ट्रातील एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकिक होता. मागील विधानसभेत ते सर्वात वयस्कर आमदार होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती.
दिवंगत एम करुणानिधी यांच्या पाठोपाठ आमदारकीच्या 11 निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

अत्यंत साधी राहणी
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राजकीय जीवनात त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता.

१९६२ पासून सांगोल्याचे नेतृत्त्व
देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

बहुतांश काळ विरोधी बाकांवरच
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आणि पक्षाने आदेश दिल्यानंतर राजीनामा देऊन ते एस टी बसने गावी परतले होते. सांगोला तालुक्यासह मानदेशाचा दुष्काळ हटवण्यासाठी पाणी परिषदांच्या माध्यमातून देशमुख यांनी पाणी चळवळ चालवली होती. सांगोला तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचवले होते. सांगोला आणि 80 गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करून देशमुख यांनी लोकांची पाण्यासाठीची पायपीट थांबवली होती.

नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी ही त्यांनी सतत संघर्ष केला. अभ्यासू, पाणीदार, वाचनाला जागणारे नेतृत्व असा त्यांचा लौकिक होता.म्हणून शासन दरबारी त्यांचा मोठा प्रभाव होत. विधानसभेत अभ्यासू भाषणातून त्यांनी सभागृह अनेकवेळा जिंकले आहे. संपूर्ण हयातभर शेकाप पक्षाशी एकनिष्ठ राहून आ. देशमुख यांनी राजकारणात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्हा आणि सांगोला तालुका पोरका झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!