भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती : माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अंत्ययात्रेस उपस्थित नागरिकांची गर्दी

सांगोला : ईगल आय मीडिया

भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण राज्यासह, जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नेते आणि सामान्यांचे नेते, अशी ओळख त्यांची होती. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी ना.भरणे श्रद्धांजली पर बोलत होते.

तत्पूर्वी सकाळी सोलापूर येथून गणपतराव देशमुख यांचे पार्थिव मोहोळ, पंढरपूर मार्गे सांगोला येथे आणले गेले.यावेळी हजारो लोकांनी मार्गावर गावोगावी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सांगोला येथे अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. आबासाहेब अमर रहे च्या घोषणांनी आसमंत भारावून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी आलेल्या सामान्य जणांना दुःख अनावर झाल्याचे दिसत होते. अनेक महिला,युवक, वयोवृद्ध नागरिक धाय मोकलून रडत होते. सांगोला सुतगिरणीच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार सर्वश्री शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोल्याच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सर्वश्री अण्णा डांगे, प्रा राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सर्वश्री रामहरी रुपनवर, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उत्तमराव जानकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

जेष्ठ सुपूत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, प्रशांत परिचारक, आमदार सुमनताई पाटील, अनिल बाबर, अण्णा डांगे, रामहरी रुपनवर, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, वाळव्याचे वैभव नाईकवडी, बाबा कारंडे यांनी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.

One thought on “भाई गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना

Leave a Reply

error: Content is protected !!