टीम : ईगल आय न्यूज
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आणि मराठा आरक्षण लढ्याचे अग्रणी माजी आ.विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खोपोलीच्या जवळ त्यांची कार पुढील ट्रक ला धडकली. मेटे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा अरक्षणासंदर्भात बोलावलेल्या मिटींगसाठी विनायक मेटे हे त्यांच्या कार ने मुंबईला जात होते, पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास भातान बोगद्याजवळ त्यांची कार समोर असलेल्या ट्रक ला मागून जोरात धडकली. यामध्ये त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
उपचारासाठी मेटे यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यावेळी मेटे यांचे निधन झाले असे डॉक्टरांनी जाहीर केले. मेटे यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली असून एक संघर्ष शील नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. बीड मधून रोजगारासाठी मुंबईत गेलेल्या मेटे यांनी सुरुवातीला इमारतींना रंग देण्याचे काम केले. त्यातून रंगकाम करण्याची कंत्राट घेत मेटे यांनी आर्थिक स्थान बळकट केले. पुढे मराठा महासंघाचे कार्य करीत त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा दीर्घ काळ चालवला. मराठा महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतःचा शिवसंग्राम पक्ष अशी त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल राहिली आहे. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने एक संघर्ष नायक गमावला आहे.