मध्यरात्री ईडी ने केली अटक
टीम : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री यांना ईडी ने सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे. तत्पूर्वी देशमुख यांची १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरे, कार्यालये व अन्य संस्थांवर ईडीनं अनेक वेळा धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, करोना, वय आणि आजारपणाचं कारण देत सुरुवातीला त्यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती.
त्यानंतरही ईडीनं त्यांना चार वेळा समन्स बजावलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. माजी गृहमंत्रीच गायब असल्यामुळं राज्य सरकारचीही कोंडी झाली होती.