सोशल मीडियावर मेसेज टाकून माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी बेपत्ता
पंढरपूर : eagle eye news
मी आत्महत्या करीत आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, लांब आहे ! अशा स्वरूपाचा मेसेज सोशल मीडिया सह प्रसिध्दी माध्यमांना टाकून भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी हे बेपत्ता झाले आहेत. माळी यांचा संदेश प्रसारित होताच तालुक्यात खळबळ उडाली आहे, त्यांच्या शोधासाठी पोलिसांसह माळी यांचे समर्थक प्रयत्न करीत आहेत.
कोण आहेत बाळासाहेब माळी ?
बाळासाहेब माळी हे भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आहेत. छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेचे त्यांनी प्रदेशउपाध्यक्ष म्हणून ही काम केलेले आहे. भाजप ओबीसी परिषदेचे पुणे विभागीय पदाधिकारी म्हणून ते काम करीत होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून माळी यांनी काम केले आहेत. दिवंगत आम. भारत भालके यांचे माळी हे खांदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. माळी यांनी समता परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात माळी समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी पंढरपूर – वेणेगाव मार्गावर दत्त कृपा पेट्रोल पंप सुरू केला आहे.
बाळासाहेब माळी यांनी सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. माळी यांचा भोसे ( तालुका पंढरपूर ) येथे दत्ताकृपा पेट्रोलियम हा पेट्रोल पंप आहे. या पंपावरील व्यवस्थापक तानाजी कोळी आणि माळी यांचे पुतणे प्रदीप माळी यांनी सुमारे एक कोटी २१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच कोळी याने मी तीन खून आणि पाच हाफ मर्डर केले असल्याची धमकी दिल्याने माझ्यासह पंपावरील कामगारांच्या जीवाला धोका असल्याचे या संदेशात म्हंटले आहे. मी आत्महत्या करीत आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, मी लांब आहे. असेही या संदेशात म्हंटले आहे.
हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश तारू यांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह भोसे परिसरातील नागरिक आपापल्या परीने माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.