फडणवीसांच्या लबाड बोलण्याची हद्द झाली : ऍड.नंदकुमार पवार

5 वर्षे सत्ता असताना का नाही सोडवला 35 गावचा पाणी प्रश्न ?

पंढरपूर : ईगल आय मिडिया

2014 सालच्या विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आल्यानंतर याच टिळक स्मारक मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आल्यानंतर 35 गावचा पाणी प्रश्न सोडवू अशी गर्जना केली होती. सत्ता आल्यावर मात्र योजनेला 1 रुपया दिला नाही,उलट योजना गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांच्या लबाड बोलण्याची हद्द झाली, अशी टीका काँग्रेस आयचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष ऍड.नंदकुमार पवार यांनी केली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील निवडणूक प्रचार सभेत बोलताना 35 गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ असे वक्तव्य केले होते.

या संदर्भात बोलताना ऍड.पवार पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे लबाड बोलत आहेत, 2014 साली टिळक स्मारक मैदानात भाषण करताना त्यांनी आमचं सरकार आलं तर 35 गावचा पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यांचं सरकार 2014 साली आलं मात्र त्यानंतर फडणवीस यांनी ही योजना पूर्ण करण्याऐवजी ती गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला. 24 पैकी 11 गावे वगळली, योजनेचे पाणी कमी केले, लाभ क्षेत्र कमी केले. न्यायालयात शपथपत्र देऊनही एक रुपयांची अर्थिक तरतूद 5 वर्षात केली नाही.

तेच फडणवीस आता यांचं राज्यात सरकार नाही आणि केंद्राकडून निधी आणण्याच्या बाता मारीत आहेत. जेव्हा हातात सर्व काही होतं तेव्हा योजनेला आडकाठी आणली आणि आता उमेदवार पडणार आहे हे दिसताच केंद्र सरकारच्या निधीचा दाखला देऊन दिशाभूल करीत आहेत. हे काय मोदींपेक्षा मोठे आहेत काय ? यांचं ऐकून मोदी पैसे देतील ? आणि जर तसं असेल तर मग राज्याला लस देऊ नका, रेमडीसीविर देऊ नका, gst चे पैसे देऊ नका, राज्यपालांना 12 आमदारांच्या शिफारस पत्रावर सही करू नका, असे फडणवीस सांगत आहेत का ? असा सवाल करून ऍड.पवार पुढे म्हणाले की, मे 2019 मध्ये अकलूजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालय करून कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्याची खोटी घोषणा केली, 2 बजेट झाले मात्र कृष्णा भीमासाठी एक रुपया तरतूद केली नाही.

त्याच केंद्राकडून 35 गावच्या योजने साठी निधी आणण्याचे आश्वासन म्हणजे निव्वळ धूळफेक असून जनतेच्या डोळ्यात फडणवीस यांनी आता तरी धूळफेक करू नये असेही आवाहन ऍड.पवार यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!