विरोधकांची एकजूट : आ.यशवंत माने यांच्या समोर तगडे आव्हान
मोहोळ : प्रतिनिधी
मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीत सोमवारी नाट्यमय घडामोडी घडून आल्या. तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकजूट करीत बारामतीला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी बदलून आणली. उद्योगपती राजू ज्ञानु खरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सिद्धी कदम यांच्या ऐवजी राजू खरे यांचे मोठे आव्हान आ.यशवंत माने यांच्या समोर उभा राहिले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी सिद्धी रमेश कदम यांना जाहीर झाली होती. सिद्धी कदम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वास्तविक उद्योजक राजू खरे हे या उमेदवारीसाठी मोठे दावेदार होते. गेल्या दोन वर्षांपासून खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर झाली. झाली.त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्व विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन बारामतीला धाव घेतली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे, राजू खरे, माजी नगराध्यक्षा सीमाताई पाटील, नागनाथ क्षीरसागर, उमेश पाटील, सोमेश क्षीरसागर, रमेश बारसकर, मानाजी माने यांच्यासह मोहोळ तालुक्यातील सर्व विरोधी नेते गोविंद बागेत दिवसभर तळ ठोकून होते.
सर्वांनी एकजुटीने उमेदवारीची मागणी केली तसेच एकजुटीने उमेदवार निवडून आणू अशी ग्वाही दिली. त्यामुळे रात्री उशिरा राजू खरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्याचे पक्षाचे पत्र
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सिद्धी रमेश कदम यांना अनवधानाने ए बी फॉर्म दिला गेलेला आहे, तो रद्द करण्यात यावा, पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानु खरे हे आहेत आहे, पत्र मोहोळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकार्याना दिलेले आहे.