शेतातच पाहतो विठ्ठल माझा

यंदा आषाढी वारी चुकल्याने वारकरी शेतीलाच पंढरी समजून काळ्या विठाईच्या सेवेत मग्न आहे

पंढरपूर : सतीश बागल

कांदा-मुळा-भाजी,
अवघी विठाई माझी !

या शब्दात संत सावता माळी यांनी माझ्या शेत शिवारात मला माझा विठ्ठल भेटत असल्याचे म्हटले आहे. यंदा कोरोना महामारीमुळे आषाढी यात्रा सोहळा रद्द झाल्यानंतर नेहमी वारीसाठी पंढरीत येणारा शेतकरी शेतातच विठ्ठल पाहतो आहे आणि पंढरीची ओढ मनात दाबून ठेवत शेतातच राबतो आहे.
यंदा आषाढीचा सोहळा चुकल्याची हुरहूर त्याच्या मनात असली तरीही
पावसाच्या रूपाने विठू शेतामंदी आला,
पेरणीच्या बियांनी त्याचे पाय धुवु चला !

या विचाराने शेतातच पेरणीची त्याची लगबग सुरु आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची आषाढी वारी चुकली तरी कष्टाने शेतीच्या पंढरीत सौख्याचा मळा फुलणार आहे. त्यातच त्याला माझा पांडुरंग भेटणार असल्याची भावना वारकऱ्याच्या मनामध्ये आहे.

पावसाने यंदा वेळेवर सुरुवात केल्याने पेरण्या सुरू झाल्या आहेत. ऊस, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, करडई लागवड हे सुरू झाली आहे. गेल्या तीन-साडेतीन महिन्यात लाॅकडाऊन काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यातूनही हिंमत न हारता त्याने आता खरिपाची तयारी करून पेरणी सुरू केली आहे. यंदाचा पायी वारी सोहळा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने पंढरीची वारी चुकणार आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाची वारी ही घरी राहूनच साजरी केली जाणार आहे.
शेतात राबत असताना तो कधी कोणती तक्रार करत नाही. येईल त्या परिस्थितीचा सामना करतो. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावलेली असली तरी, दर्जेदार बियाणे, खत, वीज आणि पतपुरवठा या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. विठ्ठलाकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साकडे घालताना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे इतकीच माफक अपेक्षा भोळ्याभाबड्या शेतकऱ्याची असणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!