मळणी यंत्रात महिलेचा मृत्यू

करंजे ( ता.खानापूर ) येथील दुर्घटना

टीम : ईगल आय मीडिया

 करंजे ( ता.खानापूर, जि. सांगली ) येथे मळणी मशीनमध्ये साडी अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुभद्रा विलास मदने (वय ५०) असे या महिलेचे नाव असून ही घटना गुरुवारी घडली.

यंदाच्या रब्बी हंगामाची पिके काढणी आणि मळणीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र मळणी यंत्रात अडकून शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. या हंगामात अशा प्रकारे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, करंजे येथील मदनेमळा येथे सुभद्रा विलास मदने या आपल्या शेतात मळणीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे गव्हाची मळणी सुरु असताना पडलेले गहू त्या वेचत होत्या. तेव्हा अचानक त्यांची साडी मळणी मशीनमध्ये अडकली आणि क्षणातच त्या मशीनमध्ये खेचल्या गेल्या आणि ही दुर्घटना घडली.

सुभद्रा यांच्या शरीराचे मशीनमध्ये अक्षरश: तुकडे तुकडे झाले आहेत. चालकाने मशीन लगेचच बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सुभद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सुभद्रा मदने यांच्या मृत्यूची बातमी कळताच विटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!