लाल वादळ मुंबईत धडकले !

21 जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईत पोहोचला

मुंबई : ईगल आय मीडिया

  केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात एकवटू लागले आहेत.

दरम्यान, या आंदोलनात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमायला सुरुवात झाली आहे. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी काही वेळापूर्वीच आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

आझाद मैदानात शेतकऱ्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी काळजी घेण्यात येत आहे.

आझाद मैदानात भव्य असा मंडपही उभारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केलं जाणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!