जिओ सिम कार्डची होळी : कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
टीम : ईगल आय मीडिया
दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी मुंबईत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजु शेट्टी व इतर शेतकरी संघटना व नेते यांच्यासह रिलायन्स कम्पनीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोदी सरकारने केलेले नवीन कृषी कायदे हे अंबानी, अडाणी सारख्या भांडवल दार कंपन्यांच्या हिताचे आहेत. असा आरोप करून देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी या कृषी कायद्याना विरोध केला आहे. दिल्लीत मागील 3 आठवड्यापासून लाखांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्याला पाठबळ देण्यासाठी मुंबईत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
अंबानीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी हा मोर्चा आडवला. या मोर्चात कृषी विधेयके रद्द करा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. जो पर्यंत मोदी सरकार कृषी विधेयके रद्द करत नाही, तो पर्यंत अंबानी व अदानी यांच्या कंपनीची कोणतीही वस्तू शेतकरी खरेदी करणार नाहीत अशी शपथ घेतली.
तसेच शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधील Jio चे सिम कार्ड सर्वांनी बदलुन घ्यावे, शेतकर्यांना सरकारच्या आडुन लुटण्याचा प्रयत्न करणार्या उद्योगपतीना वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मत राजु शेट्टी यांनी व्यक्त केले, मोर्चाच्या शेवटी Jio सिम कार्ड ची होळी करण्यात आली.