सचिन, आमच्या बापासाठी कधी ट्विट करशील ?

शेतकऱ्याच्या पोराचा सचिन तेंडुलकर ला सवाल

टीम : ईगल आय मीडिया

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेला सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. आज पंढरपूरच्या शेतकऱ्याच्या मुलाने थेट मुंबईतील सचिनच्या घरी जाऊन आमच्या बापासाठी कधी ट्विट करशील असा सवाल केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा प्रवक्ता असलेल्या रणजित बागल ( रा. गादेगाव, ता.पंढरपूर ) असे त्या युवकाचे नाव आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. राज्यात माजी खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीपासून या आंदोलनास पाठिंबा देत राज्यात आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, पॉप सिंगर रिहाना हिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर जगभरात या आंदोलनावर चर्चा सुरू झाली. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने या संदर्भात ट्विट करून बाहेरच्या व्यक्तीने आमच्या देशातील प्रश्नात लक्ष घालू नये अशा प्रकारचे ट्विट केले होते. शेतकरी आंदोलनावर ट्विट न करणाऱ्या सचिन तेंडुलकरवर त्यामुळेच ट्विटर युजर्स संतापले आणि त्यांनी सचिनला ट्रोल केले.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे युवा प्रवक्ता रणजित बागल यांनी आज मुंबईत जाऊन सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर आंदोलन केले आणि, शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ‘ आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील ?’ असा सवाल विचारला. हातात डिजिटल फलक घेऊन रणजित बागल याने सचिनला जाब विचारला.

त्याच्या या आंदोलनामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली असून सचिनला जाब विचारणाऱ्या रणजित बागल याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!