भरधाव ट्रक च्या धडकेत दूध विक्रेता ठार

मोहोळ : ईगल आय मीडिया


भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवार १९ मार्च रोजी मोहोळ शहरातील होटेल लोकसेवा जवळ सर्व्हिस रोडवर घडला. शिवाजी बाबू बंडगर (वय ३७ वर्षे, रा. रामहिंगणी ता. मोहोळ) मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आले आहे.


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रामहिंगणी येथील शिवाजी बाबू बंडगर यांचा दूध संकलन व विक्रीचा व्यवसाय आहे. हे दररोज दुचाकीवरुन दूध विक्री करतात. शुक्रवार १९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मोहोळ शहरातील हॉटेल लोकसेवा लगत असणाऱ्या सोलापुर-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने ते दुचाकीने (क्रमांक एम.एच. १३ सी.एक्स. २२४९) सोलापूरच्या दिशेने निघालेे होतेे. यावेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (क्रमांक एच.आर. ५५. ६७३२) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने शिवाजी बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवरच सोडून पळ काढला.


या प्रकरणी मयत शिवाजी बंडगर यांचे पुतणे आप्पासाहेब मल्‍हारी बंडगर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक गायकवाड हे करीत आहेत. मयत शिवाजी बंडगर यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, चार भाऊ, एक बहीण असा एकत्रित परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रामहिंगणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!