शिरढोन येथे 50 एकर ऊस जळाला : लाखो रुपयांचे नुकसान


पंढरपूर : ईगल आय मीडिया
शिरढोन ( ता. पंढरपूर ) येथे गुरुवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास 50 एकर ऊस जळाला असून 10 ते 12 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका आठवड्यातच कौठाळी पाठोपाठ शिरढोन येथेही ऊसाच्या फडाला आग लागल्याने विज वितरणातील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत.

ऊसाच्या फडाला आग : vdo पहा

या परिसरात सगळीकडे ऊस असल्याने एका मागून एक ऊसाचे फड आगीने कवेत घेतले आणि बघता बघता आग नियंत्रणाबाहेर गेली. यावेळी गावातील इतर शेतकरी, युवकांनी बाजूच्या शेतातील ऊस, पाचट कापून बाजूला केले आणि इतर फडाशी असलेली सलगता नष्ट केली त्यामुळे आगीचा प्रसार मर्यादित राखता आला.


गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जांभूळबन परिसरातील ऊसाच्या फडाला अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किट झाल्यानेच आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आगीत समाधान भुसनर यांचा सुमारे 10 एकर आणि इतर 8 ते 10 शेतकऱ्यांचा सुमारे 35 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

शिवाय नुकताच महापूर येऊन गेला त्यावेळी हा सगळा परिसर पाण्याखाली होता त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात असलेली ओल आगीला नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरली. रात्री उशिरापर्यंत ऊसाच्या फडातून आगीच्या ठिणग्या बाहेर येत होत्या त्यामुळे नेमके किती क्षेत्र जळाले आहे त्याचा अंदाज नाही. उशीरापर्यंत शेतकरी आपल्या फडाच्या संरक्षणासाठी उपाय योजना करीत बांधावर उभा असल्याचे दिसत होते.

Leave a Reply

error: Content is protected !!