संबंधीत ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे
ना. छगन भुजबळ यांचे आदेश
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदामातील संबंधित ठेकेदाराने बोगस कामगारांची नोंदणी करून काम करणार्या कामगारांवर अन्याय करून त्यांना हाकलून दिले असलेबाबत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने ना. छगन भुजबळ यांना पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदामातील ठेकेदाराचा गैर व्यवहार यावर निवेदन दिले असता भुजबळ यांनी महादेव हमाल मजूर संस्था व संबंधित ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी असेही संबंधित अधिकार्यांना छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
राज्यातील शासकीय गोदामात हमालांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. गैर व्यवहार करणारे कंत्राटदार व बोगस हमाल कामगारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. वर्धा, पंढरपूर, सांगली, बीड, औरंगाबाद येथील हमालांच्या प्रश्नासंदर्भात होणार्या गैरसोयीबद्दल डॉ.बाबा आढाव व हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी यावेळी निवेदन दिले. या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांना सकारात्मक कारवाई करण्याबाबत कळविण्याचे निर्देश दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोज सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडीचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मकदुम, डॉ. धूरट, चिटणीस सुभाष लोमटे, सहचिटणीस शिवाजी शिंदे आदीसह शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी कोरोना कालावधीत हमाल मापाडी यांनी चांगले काम केल्याबद्दल हमाल कामगारांचे अभिनंदन केले. लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेचा अन्न धान्य पुरविण्याची जबाबदारी पार पाडली. हमालांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शासकीय गोदामाचे सर्व्हेेक्षण करण्याची निर्देश दिले. त्यानुसार 885 पैकी 448 गोदामात शौचालये व पिण्याचे पाणी इत्यादी सोयी-सुविधांची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासनाने 8.62 कोटी रूपये मंजूर केले असून यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ना. छगन भुजबळ यांनी सांगितले.