5 वर्षीय जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू

वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथिल दुर्घटना

टीम : ईगल आय मीडिया

वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे पाच वर्षीय जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. आज गुरुवारी (ता. १) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. विद्या विजय बर्गे आणि वेदिका विजय बर्गे ( वय वर्षे 5 ) अशी जुळ्या मृत मुलींची नावे आहेत. एकमेकींना घट्ट पकडलेल्या स्थितीत त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे.

विजय बर्गे हे शेतमजूर आहेत. पत्नी व दोन जुळ्या मुलींसह ते ऐतवडे खुर्द येथे राहतात. गुरुवारी सकाळी त्यांनी बिरोबा मंदिर परिसरात भुईमुगाच्या शेंगा वाळवण्यासाठी उन्हात घातल्या होत्या. वडिलांसोबत त्यांच्या दोन्ही मुलीदेखील मंदिर परिसरात गेल्या होत्या. मंदिरापासून जवळच तलाव आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्या आणि वेदिका खेळता खेळता तलावाकडे गेल्या.

बराच वेळ त्या आई-वडिलांना दिसल्या नाहीत. मंदिराकडे परतल्या नसल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मुली पाण्यात बुडाल्याच्या संशयावरून शोध सुरू केला असता, दोघींचे मृतदेह पाण्यास आढळले. बुडल्यानंतर दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली होती.

घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद काटे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!