पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री राठोड संशयित
टीम : ईगल आय मीडिया
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्यापपर्यंत चुप्पी साधून गायब झालेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्या भोवतीची संशयाची सूई अधिकच वाढत चालल्याने अखेर राठोड हे गुरुवारी या प्रकरणावर बोलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे राठोड हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल मंदिरात धर्मगुरूंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजवर गप्प असलेले राठोड काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले असूूून त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राठोड नेमके गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. मात्र, आता राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव गोवलं जात आहे. यामुळे बंजारा समाजाची मोठी बदनामी सुरु आहे. ही बदनामी थांबवावी अशी भूमिका बंजारा धर्मगुरू आणि महंतांनी मांडली. पोहरादेवी इथं सेवालाल जयंती उत्सव सुरु आहे. या उत्सवादरम्यान समाजाच्या संत महंतांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वाशिममधील पोहरा देवी येथे येऊन राठोड त्यांची बाजू मांडणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राठोड नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.