अभंगराव कुटुंबावर काळाचा घाला : घाट बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
मयत : पिलू उर्फ उमेश जगताप
पंढरपूर : ईगल आय मीडिया।
चंद्रभागा नदीच्या घाटाची भिंत कोसळून ठार झालेल्यापैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. तर दोघे जण दुसऱ्या जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान घाटाच्या कामाची चौकशी व्हावी, ठेकेदार कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पंढरपूरकरातून होत आहे.
चंद्रभागा नदी तीरावर कुंभार घाटा जवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी ते फुल विक्री प्रसाद विक्री नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. आणि त्यावरच आपली गुजराण करत होते. मात्र आज दुपारी अडीचच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले. सुमारे वीस फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.
मृतांमध्ये पिलु उमेश जगताप ( वय १३, रा.भंडीशेगाव ) , मंगेश गोपाळ अभंगराव (वय ३५) , राजाबाई गोपाळ अभंगराव (वय ५०) , गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७० वर्षे ) अशी मयतांची नावे आहेत.
तर अन्य दोन जण पर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते, त्यांची नावे अद्यापही समजली नाहीत. दरम्यान या घटनेनंतर पंढरीत खळबळ उडाली असून संबंधित ठेकेदार कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कामाच्या गुणवत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.