ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित : नितीन उघडे
टीम : ईगल आय मीडिया
अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या मुख्य शाखेसह इतर 6 शाखेत 27 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे सांगून ऑडिटर जी बी राठी अँड कंपनीने 9 नोव्हेंबर रोजी अकलूज पोलिसात चुकीची सप्लीमेंट्री केस सूडबुद्धीने दाखल केलेली आहे. यामुळे बँकेच्या सभासद व ठेवीदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जी बी राठी आणि कंपनी यांनी केलेला आरोप बिनबुडाचे व चुकीचा असून त्यात कोणतेही तथ्य नाही, यामुळे सभासद व ठेवीदारांनी आपल्या ठेवीची कोणतीही काळजी करू नये, आपल्या ठेवी सुरक्षित असल्याची माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक नितीन उघडे यांनी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, 1975 साली लायसन मिळालेली व सन 1978 झाली सुरू झालेली स म शंकरराव मोहिते – पाटील यांनी स्थापन केलेली सुरूवातीची शेतकरी बँक नंतरच्या काळात शंकरराव मोहिते – पाटील सहकारी बँक म्हणून सर्वदूर परिचित असून मुख्य शाखेसह या बँकेच्या एकूण 10 शाखा आहेत शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची ही बँक असून 102 कोटी रुपयांच्या या बँकेत ठेवी असून 65 कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.
जी बी राठी आणि कंपनी पुणे यांनी बँकेचा लेखापरीक्षण अहवाल बँकेच्या संचालक मंडळास व जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांना न देता या बँकेचे कार्यक्षेत्र राज्य असूनही सहकारी आयुक्तांना स्पेशल रिपोर्ट सादर न करता बँकेची बदनामी व्हावी, कर्जदार व ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा हा हेतू मनात ठेवून पोलिसात सप्लीमेंट्री केस दाखल केलेली आहे. यापूर्वीही या ऑडिटर जी बी राठी आणि कंपनीने अशीच कृत्य केलेली आहेत. यामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या या ऑडिटर जी बी राठी आणि कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचे लायसन रद्द करावे यासाठी गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करीत आहोत.
अशोक तडवळकर, चेअरमन, पश्चिम महाराष्ट्र ऑडिटर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
जी बी राठी आणि कंपनीने यावर्षी बँकेचे ऑडिट केले वास्तविक पाहता सदरचा ऑडिट रिपोर्ट बँकेस देणे बंधनकारक असतानाही तो न देता अथवा बँकेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना न कळविता बँकेच्या संचालक मंडळाला न सांगता आमच्या सह्या न घेता थेट पोलिसात जाऊन सप्लीमेंट्री केस दाखल केली आहे हे काम सूडबुद्धीने केले असून नियमबाह्य पद्धतीने केस दाखल केलेले आहे. या विरोधात आम्ही डी डी आर कडे फेर लेखा परीक्षणाचा अर्ज केला असून बँकेची विनाकारण बदनामी करून खोटी केस केल्याबद्दल जी बी राठी आणि कंपनी विरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ही बँक व्यवस्थित व सर्वांच्या विश्वासाने व सहकार्याने सुरू असून विनाकारण जाणीवपूर्वक बँकेस बदनाम करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न जी बी राठी आणि कंपनीकडून केला जात आहे असून सभासदांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता बँकेस सहकार्य करावे आपल्या ठेवी सुरक्षित आहेत सभासदांनी व ठेवीदारांनी निश्चिंत राहावे लवकरच सत्य आपल्यासमोर येईल असे आवाहन यावेळी मुख्य व्यवस्थापक नितीन उघडे यांनी केले आहे