फुले – शाहू – आंबेडकर विचार मंचाची मागणी
पंढरपूर : eagle eye news
राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य योजनांसाठी वापरू नये अशी मागणी येथील फुले – शाहू- आंबेडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यासंदर्भात मंचाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे याना निवेदन दिले आहे.
राज्य सरकारने नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडका भाऊ, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनांसाठी राज्य सरकार सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरणार आहे, तशा प्रकारचा निर्णय घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या निधीत कपात करण्यात आलेली आहे.
अनु. जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची रक्कम वेळेवर मिळत नाही, अनु. जाती वर्गातील पी एच डी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप वेळेवर मिळत नाही, रमाई घरकुल योजनेसाठी निधी मिळत नाही, दलित वस्ती सुधार योजनेसाठीचा निधी कपात करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनु. जाती, जमाती घटकावर अन्याय होत आहे. संविधानाने या मागास समाज घटकाच्या उन्नतीसाठी या कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत त्यांचा भंग होत आहे.
त्यामुळे राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून तो अन्यत्र वापरू नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. यावेळी मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड, श्रीकांत कसबे, सेवागिरी गोसावी, राजेंद्र पाराध्ये, उमेश पवार,गौतम साबळे, बाळू डावरे, मंगेश डावरे, हणुमंत बंगाळे सुनील दंदाडे , एल एस सोनकांबळे, नानासाहेब लोखंडे, देविदास कसबे, गुरु दोडिया, दशरथ दोडके आदी उपस्थित होते.