सुब्रह्मण्यम स्वामींची याचिका फेटाळण्याची न्यायालयास विनंती करणारा ठराव मंजूर
पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 या कायद्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल दाखल याचिका फेटाळून लावली जावी, अशी मा. उच्च न्यायालयास विनंती करणारा ठराव गादेगांव ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर टेम्पल अॅक्ट रद्द करून श्री विठ्ठल मंदिर खाजगी करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या पार्श्व भुमीवर गादेगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी गुरुवारच्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर केला आहे.
गादेगांव ग्रामपंचायतीने गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत सरपंच सौ. दिपाली धनाजी बागल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं. कार्यालय परिसरात घेण्यात आली. या ग्रामसभेत विविध विषयांचे वाचन करून त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यावेळी गादेगांवचे ग्रामस्थ व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी विष्णू बागल यांनी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 हा वारकरी हिताचा, विठ्ठल, रुक्मिणी देवस्थानच्या विकासाचा असून हा कायदा रद्द झाल्यास मंदिराचे खाजगीकरण होणार आहे, त्यामुळे हा कायदा कायम राहावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयास विनंती करणारा आणि राज्य शासनास समर्थन देणारा ठराव मांडला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून या ठरावास एकमताने मंजुरी दिली.
प्रारंभी गादेगांव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभेत विविध विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला शासकीय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर दलितवस्ती सुधारणा योजनेतील विविध विकासकामांबद्दल, जल जीवन मिशन योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना, नवीन गाळे बांधणे, ग्रामपंचायतीचा कर वसुल करणे, दलितवस्ती सुधारणा योजना आराखडा तयार करणे, अंतर्गत पाणी पुरवठा नवीन पाईप लाईन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व कर वसुलीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येवून या सर्व विषयांना ग्रामसभेत मंजूरी देण्यात आली. याचवेळी अध्यक्षांच्या पुर्व परवानगीने येणार्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
विषयांचे वाचन ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे यांनी केले. यावेळी गादेगांव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यकांत बागल, बाजार समितीचे संचालक महादेव बागल, मोहन बागल यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सरपंच, माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.