तर उपसरपंचपदी योगेश बागल यांच निवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गादेगाव ( ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कु ज्योती बाबर तर उपसरपंच पदी योगेश दत्तात्रय बागल यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे गावचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेले असताना ग्रामस्थांनी पहिल्यांदा अनु जाती प्रवर्गातील उच्च शिक्षित कु.ज्योती बाबर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड केली आहे. गावच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
गादेगावच्यासरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीवेळी सरपंच पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले होते. त्यामुळे या प्रवर्गातील एकमेव सदस्या कु.ज्योती बाबर यांची सरपंचपदी निवड निश्चित मानली जात होती. त्यांचे सत्कार आणि अभिनंदन ही केले गेले.
दरम्यान,पंढरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे न्यायालयीन प्रकरणानंतर फेर आरक्षण काढण्यात आले, त्यामध्ये गादेगावचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले होते. या फेर आरक्षण सोडतीचे ज्योती बाबर यांनीही स्वागत केले होते. मात्र त्यांच्या सरपंचपदाची संधी हुकल्याने सर्व ग्रामस्थांनी खुल्या जागेवरून ज्योती बाबर यांना सरपंच करण्याचे ठरवले आणि त्यानुसार आज ( दि.26 फेब्रुवारी ) रोजी सरपंच पद निवडीवेळी केवळ ज्योती बाबर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच पदासाठी योगेश बागल या युवकाची निवड झाली असून सरपंच आणि उपसरपंच हे दोघेही पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत, दोघेही पदवीधर शिक्षित आहे.
ग्रामस्थांच्या या निर्णयाबद्दल नूतन सरपंच ज्योती बाबर आणि उपसरपंच योगेश बागल यांनी आभार मानले आहेत आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करू अशी ग्वाही दिली आहे. निवडीनंतर नूतन सरपंच आणि उपसरपंच यांचे सत्कार करण्यात आले. गुलाल आणि फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला गेला.