गजानन गुरव यांचा मंदिर समितीचा पदभार काढला

संजीव जाधव नवे कार्यकारी अधिकारी 


पंढरपूर  : ईगल आय न्यूज


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार  प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याकडून काढुन घेतला असून त्यांच्या जागी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन गुरव यांचा 11 महिने 24 दिवसांचा कार्यकाल वादग्रस्त राहिला आहे. 


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांची बदली झाल्यानंतर 4 ऑक्टोबर 2021 रोजी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याकडे मंदिर समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. या दरम्यान मंदिर समितीच्या कारभारात ढिसाळपणा आल्याने सतत टीका झाली. 


श्री रुक्मिणी मातेच्या पायाची झालेली गंभीर झीज, आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात अति महत्वाच्या व्यक्तिंसाठी झालेले बेसुमार प्रवेश पास वाटप, मंदिराच्या सभा मंडपात भजन, किर्तनास घातलेली बंदी अशा वादग्रस्त निर्णयावरून गुरव यांच्या बदलीची मागणी होत होती.

मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदावर अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे महसूल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सोलापूर येथील आराखडा बैठकीवेळी स्पष्ट केले होते. 
त्यानुसार महसूल आणि वनविभागाने बुधवारी आदेश काढून प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याकडील कार्यभार काढून घेतल्याचे आणि अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!