सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फूट उंच मूर्तीस परवानगी : मिरवणुकास मनाई
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येत्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासंदर्भात शासकीय निर्बंध आज जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 4 फुटांपेक्षा मोठी मूर्ती स्थापन करता येणार नाही. शिवाय गणेश आगमन आणि विसर्जन या दोन्ही वेळेस मिरवणुका काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने, कोरोनाचे नियम पाळून यंदाही गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.
आज ( दि.8 ) जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांनी गणेशोत्सवासंदर्भात कोरोनाचे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार सर्व गणेशोत्सव मंडळांना काटेकोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
घरी बसवण्यासाठी 2 फूट उंच तर सार्वजनिक ठिकाणी 4 फूट उंच गणेशमूर्ती असावी, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, कोरोनाचे नियम पाळून स्वच्छता, स्यानेटाईझर, मास्क वापरण्यात यावेत, मनोरंजक आणि गर्दी खेचणारे कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्य शिबीर, कोरोना, डेंग्यू संदर्भात जनजागृती करणारे कार्यक्रम घेण्यात यावेत आशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.