3 महिन्यापासून उत्पन्न बंद : 17 कोटी रुपयांचा आर्थिक फटका
पंढरपूर : ईगल आय मीडिया
लॉक डाऊनमुळे आषाढी यात्रेसह 3 महिन्यांत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुमारे 17 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यंदा आषाढीसाठी येऊ न शकलेल्या विठ्ठल भक्तांनी online पद्धतीने मंदिर समितीला देणग्या द्याव्यात असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री सुनील जोशी यांनी केले आहे.
कोरोनामुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च पासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे मागील 3 महिन्यापासून भाविकांकडून देवस्थानला येणारे देणगी स्वरूपातील उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे.
शिवाय 25 मार्चपासून सुरू होणाऱ्या चंदन उटी पूजा आणि भाविकांच्या नित्य पूजा रद्द कराव्या लागल्या आहेत. चंदन उटी पूजा दररोज 3 वेळ केल्या जातात त्यामुळे दररोजचे किमान 75 हजार रुपये मागील 90 दिवसांत बुडाले आहेत. नोंदणी झालेल्या 40 उटी पुजांचे पैसे भाविकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे चंदन उटी पूजेच्या माध्यमातून मिळणारे सुमारे पावणे सात कोटी रुपये, नित्यपूजेतून मिळणारे सुमारे 3 कोटी रुपये यंदा बुडाले आहेत. त्यातच चैत्री यात्रा रद्द करावी लागल्याने त्या यात्रेतून मिळणारे सुमारे 2 कोटी रुपये, दान पेटी, देणगी पावती, फोटो विक्री, प्रसाद विक्री या माध्यमातून मंदिर समितीला मार्च ते मे अखेर सुट्ट्यांमध्ये येणाऱ्या भाविकामुळे मोठे उत्पन्न मिळते. परंतु यंदा भाविकच आले नसल्याने सुट्टीच्या कालावधीत मंदिर समितीचे उत्पन्न ठप्प झाले.
मागील 3 महिन्यात समितीचे सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले नाही, शिवाय चैत्री यात्राही झाली नाही. कोरोना आपत्तीमुळे राज्य शासनाला मंदिर समितीने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. शहरात अडकलेले निराधार नागरिकांना मंदिर समितीने 3 महिन्यात दररोज 3 हजार पॅकेट्स अन्न दान केले आहे, त्याच बरोबर पीपीई किट वाटप, भटक्या जनावरांना चारा वाटप या माध्यमातून समितीने सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
त्याच बरोबर मंदिर समितीला अंतर्गत विविध प्रलंबित कामासाठी या काळात मोठा खर्च करावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी यात्रासुद्धा रद्द झाल्यामुळे मंदिर समितीला आणखी सुमारे 5 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता श्री विठ्ठल मंदिर समितीला सुमारे17 कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागले आहे.
या आर्थिक नुकसानीमुळे भविष्यात भाविकांच्या सुविधांसाठी समितीला आता मोठ्या स्वरूपात देणग्यांची आवश्यकता आहे.
यंदा आषाढी साठी न येऊ शकलेल्या भाविकांनी मंदिर समितीला online पद्धतीने देणग्या द्याव्यात अशी अपेक्षा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.
मागील 3 महिन्यापासून मंदिर समितीचे उत्पन्न पूर्णपणे बंद आहे.त्यामुळे पुढच्या काळात भाविकांना अधिक सुविधा पुरवण्यासाठी, नियोजित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक टंचाई जाणवणार आहे. यंदा आषाढीसाठी भाविक पंढरीला येऊ शकत नाहीत. मात्र त्यांनी online पद्धतीने मंदिर समितीला देणगी द्यावी. – श्री सुनील जोशी
कार्यकारी अधिकारी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती