123 अधिकारी, पोलीस बंदोबस्त, 4 ठिकाणी अर्ज दाखल करण्याची सोय,
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील 72 ग्रामपंचायतिच्या निवडणूकीसाठी उद्या( बुधवार दि. 23 पासून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या दृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली असून 4 ठिकाणी उमेदवारी भरण्याची सोय केली आहे. 51 निवडणूक निर्णय अधिकारी तर 72 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मदतनीस असे 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार एस पी तीटकारे यांनी दिली आहे.
उद्या पासून प्रत्यक्षात निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या साठी इच्छुक उमेदवारांकडून जातीचे दाखले, उत्पन्न, रहिवासी व अन्य आवश्यक कागदपत्रे जमविण्याची धावपळ सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, हे सर्व संबंधित अधिकारी तहसिल, व पंचायत समिती मध्ये आहेत. शिवाय सेतुमधून अनेक दाखले मिळत असल्याने ते जमविण्यासाठी 72 गावातील इच्छुक उमेदवारानी मंगळवारी दिवसभर पंढरपुर तहसिल च्या परिसरात मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.
पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली झाली आहे. उद्या बुधवार (दि 23 ते 30 डिसेंबर) या 8 दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. एकाचवेळी 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने प्रशासनाने तयारी केली आहे. तालुका पंचायत समिती चे शेतकरी भवन, तहसिल चे शासकीय धान्य गोदाम, रायगड भवन व तहसीलच्या आवारात 4 ठिकाणी विभाग निहाय उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे.