सर्वाधिक अर्ज पळशी, जैनवाडी ग्रामपंचायतसाठी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील 72 ग्रामपंचायती साठी निवडणूक होत असून आज गुरुवार ( दि.24 रोजी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसऱ्या दिवशी 17 ग्रामपंचायतीसाठी 86 अर्ज दाखल झाले आहेत. तर पहिल्या दिवशी केवळ 2 अर्ज दाखल झाले होते.
वाखरी 05, गादेगाव 01, चिलाई वाडी 02, रांझनी 01 , उंबरे 07, पिराची कुरोली 03, आंबे चिंचोली 03, फुलचिंचोली 01, नारायण चिंचोली 02, भाळवणी 01, शंकरगाव नळी 02, भंडीशेगाव 02, शिरढोन 09, सरकोली 01, जैनवाडी 18, पळशी 21, भटुंबरे 08, असे 17 ग्रामपंचायतीसाठी 86 उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले आहेत. तर पहिल्या दिवशी बुधवारी केवळ 02 अर्ज दाखल आहेत.
पंढरपूर तालुक्यातील 94 पैकी तब्बल 72 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. याकरिता गावोगावी मोर्चे बांधणी सुरू आहे. उमेदवार निवडी, आघाडी बनवणे, प्रचाराची मोहीम आखणे आदी कामे सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर असल्याने 23 पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
निवडणूक विभागाने ग्रामपंचायत ची संख्या लक्षात घेता 4 ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी केवळ 2 अर्ज दाखल झाले होते. मात्र आज ( गुरुवारी ) दुसऱ्या दिवशी तब्बल 86 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे एकूण 88 अर्ज दाखल झाले आहेत. उद्यापासून 3 दिवस सुट्टी असल्याने सोमवार पासून अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.