गुरसाळे जवळ आणखी एक अपघात : वडील ठार, मुलगा जखमी

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


पंढरपूर : ईगल आय न्यूज


भरधाव ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील एकजण जागीच ठार झाला, तर एकजण जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि.२१) सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर – टेंभुर्णी मार्गावर गुरसाळे गावाजवळ घडला. 


शिवाजी तुळशीराम माने (वय ५७, रा. खरात वस्ती, गुरसाळे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. त्यांचा मुलगा गणेश शिवाजी माने (वय ३०) हा जखमी आहे. नातेवाईकाच्या लग्नाकरिता आहेर आणण्यासाठी शिवाजी माने व गणेश माने हे पिता-पुत्र आपल्या होंडा शाईन मोटारसायकलवरून (एम.एच. १३ / डी.एन. ४४६२) पंढरपूर येथे निघाले होते.

यादरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने (एम.एच. ४५ / एफ. ०४८९) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. भटुंबरे हद्दीतील आबा कारंडे यांच्या वस्तीजवळ हा अपघात घडला. यामध्ये शिवाजी माने हे ट्रॅक्टरखाली सापडल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर गणेश माने हे बाजुला पडल्याने बचावले.

याप्रकरणी गणेश माने यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली असून ट्रॅक्टर चालक संजय दादा वाघमारे (रा. चिकमहुद, ता.सांगोला) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!