नांदेड जिल्ह्यातील सहस्त्र कुंड धबधब्यात घेतल्या उड्या
टीम : ईगल आय मीडिया
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाला कंटाळून हदगाव ( जि नांदेड ) येथील एका व्यापारी कुटुंबातील पती,पत्नीसह 3 मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यातील 2 जणांचे मृतदेह अजूनही सापडले नाहीत.
कवाना ( ता. हदगाव, जि नांदेड ) येथील मूळ रहिवासी असलेले भगवानराव वल्लमशेटवार कवानकर यांचे शहरात घाऊक किराणा दुकान आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दोन मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. या वादातूनच आठ दिवसांपासून त्यांचे किराणा दुकान बंद होते. त्यांच्या नातेवाइकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्यातील संपत्तीचा वाद विकोपाला गेला होता.
प्रवीण वल्लमशेटवार यांनी पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची समोर आले आहे. ही घटना मंगळवार (दि.29) रोजी घडली असली तरी काल गुरूवारी ( 1 ऑक्टोबर ) रोजी प्रवीण यांचा मृतदेह सापडल्यानंतर प्रकार उघडकीस आली. संपत्तीच्या वादातूनच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेला अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दुजोरा दिला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
मंगळवारी प्रवीण कवानकर (वय ४२) हे आपली पत्नी अश्विनी (वय ३८), मोठी मुलगी सेजल (वय २०), लहान मुलगी समीक्षा (वय १४) आणि मुलगा रिद्धेश (वय १३) हे सर्व जणं नांदेडकडे जातो म्हणत घरून निघाले, परंतु त्यांनी भाडय़ाची टॅक्सी करून थेट सहस्त्रकुंड गाठले आणि त्याचदिवशी या पाचही जणांनी धबधब्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूर, अश्विनी आणि रिद्धेश यांचा मृतदेह दराडी येथे आढळून आला. अद्यापही सेजल आणि समीक्षा या दोघींचे मृतदेह सापडले नाहीत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रवीण यांच्या खिशात मोबाइल सापडला असून त्यातील सीमकार्डच्या आधारे पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटविली आहे. इस्लापूर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलावून मृतदेहांची खात्री पटवली. संपत्तीच्या वादाप्रकरणी यापूर्वी पोलीस स्थानकात कोणतीही फिर्याद दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.