१५० हुन अधिक जखमी : हॉस्पिटल बाहेर ९५ मृतदेहांचा खच
TEAM : EAGLE EYE NEWS
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील रतिभानपूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२० हुन अधिक भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक १५० हुन अधिक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना एटा मेडिकल कॉलेज येथे भर्ती करण्यात आले आहे. भोले बाबा याच्या सत्संगादरम्यान मंगळवारी दुपारी ही घटना घडली. घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील हातरस पासून ४७ किमी दूर रतिभानपूर फुलराई गावात भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता. सत्संगच्या अखेरीस अचानक गोंधळ उडाला आणि चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगरा चेंगरीत १२० हुन अधिक भाविक ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एटा येथील हॉस्पिटल बाहेर ९५ मृतदेहांचा खच पडल्याचे दिसून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हुन अधिक महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एटा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रतिभानपूर येथील सिकंदराराऊच्या सत्संग महोत्सव सुरू होता. ही घटना तेव्हा घडली, असे एटा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीएमओंनी सांगितले.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या संख्येने जखमी लोकांना रुग्णालयात आणले जात आहे.या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीमागे कोणत्याही प्रकारच्या अफवाचे वृत्त नाही. सुरक्षा रक्षकाने भक्तांना रोखले होते. ज्यामुळे अनेकांनी श्वास कोंडल्याची आणि गुदमरल्याची तक्रार केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेचे वृत्त कळताच जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना रुग्णालयात जाऊन जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याच बरोबर एडीजी आग्रा आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज्य सरकारमधील दोन मंत्री लक्ष्मी नारायण, संदीप सिंह यांच्यासह मुख्य सचिवांसह डीजीपी घटनास्थळी रवाना झाले आहेत.