परतीच्या पावसाने झोडपले : रात्रीत एकूण 332मिमी पाऊस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
परतीच्या पावसाने पंढरपूर तालुक्यास झोडपून काढले असून मंगळवारी रात्री 11 वाजल्यानंतर तालुक्यातील सर्वच मंडलात जोरदार पाऊस झाला आहे. विशेषतः तुंगत, पुळूज, पंढरपूर मध्ये अतिवृष्टी झाली आहे. रात्रीत तालुक्यात एकूण 332 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
पंढरपूर तालुक्यात यावर्षी पावसाने हात आखडता घेतला आहे. जून महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर जुलै, ऑगस्ट मध्ये दडी मारली होती. तर सप्टेंबर मध्ये सरासरी इतकाच पाऊस झाला आहे. उजनी धरण ही कसे बसे 100 टक्के झाले आहे.
पंढरपुर तालुक्यात आज दि. 6 ऑक्टोबर रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय पुढीलप्रमाणे आहे. करकंब- 5 मिमी, पट कुरोली 15 मिमी, भंडीशेगाव -45 मिमी, भाळवणी- 39 मिमी, कासेगाव -14 मिमी, पंढरपूर-52 मिमी, तुंगत- 62 मिमी, चळे- 42.2 मिमी, पुळुज 59 मिमी असून तालुक्यातील आजचा एकूण पाऊस 332 मिमी तर सर्व 8 मंडलात झालेला सरासरी पाऊस मि.मी. 36.88 मिमी एवढा आहे.
यंदा अगदी मोजून, मापून अशा प्रमाणात तालुक्यात पाऊस झाला आहे. पावसाळा सरत असताना परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. त्यानुसार परतीचा पाऊस लाभदायक ठरतो आहे.
मागील 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. मंगळवारी रात्री 11 नंतर तालुक्यातील सर्व भागात विजांच्या कडकडाटा सह मध्यम ते जोरदार पाऊस सुरू झाला. तुंगत 62मिमी, पुळूज 59 मिमी या भागात मुसळधार पाऊस नोंदवला गेला तर पंढरपुर 52, भांडीशेगाव 45 मिमी. चळे 42 मिमी, भाळवणी 39 मिमी. असा पाऊस झाला आहे.
रात्री 11 वाजता उजनी धरण अधिकृतपणे 100 टक्के भरले आहे आणि रात्रीच तालुक्यात दमदार पाऊस ही झाला आहे. त्यामुळे आता दिवाळी अखेर पाण्याची चिंता नाही अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.