गृहमंत्री च म्हणतात ‘तुमची तक्रार पोलीस स्टेशनला सांगतो !’

राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत

टीम : ईगल आय मीडिया।

नवीन वर्षाच्या पहिल्या मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तालयात कंट्रोल रुमध्ये फोन वाजतो आणि स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तो फोन घेतात. तक्रारदार व्यक्तीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि त्यांची तक्रार ही ऐकून घेतात. हा प्रसंग पुणे पोलिसांनी 1 जानेवारीच्या मध्यरात्री अनुभवला.

सिंहगड रोड वरील आनंद नगर मधील एका सोसायटी परिसरात मोठ्या आवाजात स्पिकर्स सुरू असल्याची तक्रार एका व्यक्तीने यावेळी दिली. त्यावर अनिल देशमुख यांनी, “तुमची तक्रार बाजूच्या पोलीस स्टेशनला सांगतो” असे म्हणत तक्रारदाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 31 डिसेंबरच्या रात्री १२  वाजता पुणे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहुन नववर्षाचे स्वागत केले. गृहमंत्र्यांनी यावेळी होप २०२१ असे लिहिलेला केप कापला. तसेच पोलीस दलाला नविन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. २०२१ हे वर्ष आशादायी असणार आहे, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः नियंत्रण कक्षात येणाऱ्या तक्रारींचे निवारण केले.

Leave a Reply

error: Content is protected !!