पंढरपूर शहर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात


विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट : देवाला तिरंगी पोशाख : मुस्लिम बांधवांची अभूतपूर्व तिरंगा रॅली

पंढरपूर : ईगल आय न्यूज


पंढरपूर शहर आणि तालुक्यात देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली, देवाला तीन रंगी पोशाख नेसवला गेला. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन शहरात अभूतपूर्व अशी तिरंगा रॅली काढली या रॅली मध्ये हजारो मुस्लिम युवक आणि नागरिक तिरंगा घेऊन सामील होते. याशिवाय शासकीय कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत कार्यालये, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वतंत्रदिनानिमित्त खाऊ आणि मिठाईचे वाटपही केले.

७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंद‍िर समितीच्यावतीने सकाळी विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समिती सदस्य ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.


मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट :
स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास व भक्तनिवास इमारतीस तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. तसेच मंदिरातील प्रवेशद्वार, चारखांबी, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मोरया प्रतिष्ठान या संस्थेने फुलांची आरास मोफत करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी केशरी झेंडू, स्पिंगर, शेवंती इत्यादी एक टन फुलाचा वापर करण्यात आला होता. तसेच परंपरेनुसार दुपारी पोशाखा वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले.हिरवे धोतर, केसरी रंगाचा अंगरखा, खांद्यावर पांढरे उपरणे या तीनरंगी रंगात सावळा विठ्ठल खुलून दिसत होता.

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

पंढरपूर तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, अपर तहसिलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नायब तहसिलदार विजय कुमार जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
येथील कर्मवीर औदूंबररावजी पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता मुन्नागिर गोसावी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव साळुंखे, सचिवा सौ.स्मिता अटकळे, प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे, सर्व शिक्षक स्टाफ, पालक,विद्यार्थि उपस्थित होते. यावेळी इ. १० वीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आर्या बहिरवाडे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच तालुका स्तरीय कुस्तीस्पर्धे मध्यें यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गितावर नृत्य सादर केली,वक्तृत्त्व स्पर्धां घेण्यात आल्या. विद्यालयाच्या बालगृहातील दोन माजी विद्यार्थ्यांची पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

द.ह.कवठेकर प्रशालेत ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशाला , अध्यापक विद्यालय, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल , आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे संयुक्तरित्या देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा.रजनीश कवठेकर, प्रमुख पाहुणे डॉ.संतोष पिसे, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी यांच्या हस्ते व ध्वजवंदन करण्यात आले. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी यांनी सर्व क्रांतीवीरांचे स्मरण केले. डॉ.श्री.संतोष पिसे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे डॉ. मिलिंद जोशी ,संजय कुलकर्णी, पालक संघ उपाध्यक्ष मंदार लोहकरे ,सहसचिवा सौ. दिपाली सतपाल, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये ७८ वा स्वातंत्र्य महोत्सव संपन्न
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन येथे १५ ऑगस्ट रोजी बालरोगतज्ञ डॉ.नीरज शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, संस्थेचे अध्यक्ष दिलीप शहा, माजी नगरसेवक तुकाराम राऊत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वातंत्र्य उत्सवांमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी प्रशालेतील उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सादिगले व चंद्रकला फाळके यांनी केले. तर आभार गिरीश खिस्ते यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!