कोविड हॉस्पिटलमध्ये ‘सिस्टर्स’कडून केले रक्षाबंधन

जैन सोशल ग्रुपने रक्षाबंधन दिनी केला ‘बहिणी’चा सन्मान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोना महामारीच्या काळात कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना ग्रस्त रुग्णांची सुश्रूषा करणाऱ्या परीचारकांच्या हातून राखी बांधून घेत पंढरपूर जैन सोशल ग्रुपच्या वतीने कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन ‘सिस्टर्स’चा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे.


बहिण – भावाच्या नात्यात भावाने बहिणीचे सदैव रक्षण करावे हा रक्षाबंधनचा हेतू समजला जातो. त्याच पारंपरिक समाजातून यंदाचा रक्षाबंधन सण साजरा केला गेला. मात्र जैन सोशल ग्रुपच्या वतीने यंदा कोरोना काळात असंख्य भावांची सेवा करून अनेकांना कोरोना सोबतच्या संघर्षात भक्कम आधार देऊन त्यांच्या जीविताचे संरक्षण करण्याचे काम करणाऱ्या ‘सिस्टर्स’चा सन्मान करण्याचे ठरवले गेले.

गेल्या दिड वर्षापासुनच्या या कोरोना काळात जगातील सर्वच दवाखान्यांमधील परिचारिकांनी (नर्सेस) ज्यांना आपण “सिस्टर” म्हणुन संबोधतो त्यांनी अखंड परिश्रम घेत आपल्या सारख्या लाख्खो बहिण-भावांचे प्राण वाचविले आहेत. जिथे या रोगामुळे स्वतःच्या घरच्यांनाही आजारी माणसाच्या जवळ जायला परवानगी नव्हती, तिथे या “सिस्टर्स”नी स्वतःचा जीव धोक्यात घालुन चोवीस तास रुग्णांसोबत राहुन त्यांची सेवा केली आहे,

रसिक कोठाडीया, जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष

जैन सोशल ग्रुप तर्फे भावांचे रक्षण करणाऱ्या या “सिस्टर्स”ना त्यांच्या कार्याबद्दल कौतुकास्पद सन्मान देण्यासाठी त्यांच्याकडुन राखी बांधुन घेण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला. आणि ग्रुपच्या सदस्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सिस्टर्स च्या हस्ते राखी बांधून घेतली. या अनोख्या सन्मानामुळे अनेक परिचारिका भारावून गेल्याचे दिसून आले.
येथील अपेक्स हॅास्पिटल मधे डॅा. अरिफ बोहरी व डॅा. स्वाती फडे यांनी या कार्यक्रमास स्वता हजर राहुन सर्वोतोपरी मदत केली.

“आम्ही कोविड हॅास्पिटल मधे काम करतो म्हणुन आमचे रक्ताचे भाऊही राखी बांधुन घ्यायला येत नाहीयत, पण तुम्ही आम्हाला जो सन्मान दिलात तो शब्दात सांगताच येणार नाही” अशी प्रतिक्रिया अपेक्स हॅास्पिटल मधिल एका परिचारीकेने दिली.

यावेळेस जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिक कोठाडीया, कमेटी अध्यक्ष पवन शहा, उपाध्यक्ष उज्वल दोशी तसेच डॅा. श्री विशाल फडे, दिपक चंकेश्वरा, दिपक शहा, प्रमोद शहा व जैन सोशल ग्रुपचे अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते. जैन सोशल ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!