एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, अनिल पाटील बिनविरोध होण्याच्या वाटेवर : रक्षा खडसे, स्मिता वाघ, संतोष चौधरी यांचे अर्ज बाद
टीम : ईगल आय मीडिया
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्के बसले आहेत. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. रक्षा खडसेंनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून दाखल केला होता.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बोदवड मतदारसंघात देखील रविंद्र पाटील व रोहिणी खडसे या दोघांचेच अर्ज आहेत. त्यापैकी रोहिणी खडसे यांनी माघार घेतल्यास ऍड. पाटील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.
भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पारोळा सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे चिमणराव पाटील धरणगाव विकास सोसायटी राष्ट्रवादीचे संजय पवार, एरंडोल येथे सेनेचे अमोल पाटील यानतंर आता अमळनेर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, बोदवड रविंद्र पाटील तर मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून एकनाथ खडसे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
भाजपासाठी हा जबर धक्का मानला जात आहे.जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सहा जागा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.