सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील दुसऱ्या घटनेत 3 मुलांना जलसमाधी
टीम : ईगल आय मीडिया
जळगाव शहराजवळील नशिराबाद गावातील तीन मुले गावाजवळील चारीत पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज ( सोमवारी ) दुपारी २.३० वाजता घडली. सायंकाळी सहा वाजता तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मोहित दीपक शिंदे (वय ११), आकाश विजय जाधव (वय १३) व ओम सुनील महाजन (वय ११) अशी मृत मुलांची नावे आहेत. तिन्ही मुले परस्पर नात्यांमधील आहेत.
रविवारी अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा नदीत 3 मुलांसह आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ सोमवारी पुन्हा 3 मुलांच्या मृत्यूची बातमी आली आहे.
सोमवारी दुपारी मोहीत, आकाश व ओम हे तिघे नशिराबाद पेठ भागात असलेल्या पाटचारीत पोहण्यासाठी गेले होते. दुपारी २.३० वाजता ते पाण्यात बुडाल्याचे गुरे चारणारे शेतकरी सोपान वाणी यांच्या लक्षात आले. यानंतर वाणी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. यातील दोन मुलं आतेभाऊ-मामेभाऊ आहेत.
एका मुलाचा मृतदेह काही वेळातच हाती लागला. यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा शोध सुरू झाला. पट्टीच्या पोहणाऱ्यानी सायंकाळी सहा वाजता आणखी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यानच्या वेळात मुलांचे कुटुंबीय देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.